रुग्ण-डॉक्टर नातेसंबंध घट्ट करा

'पूर्वीपासून समाजात रुजलेली फॅमिली डॉक्टर संकल्पना काहीशी मागे पडत आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली डॉक्टरशी जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. काळाच्या ओघात संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विसंवाद वाढू लागला आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांनी समन्वयाने संवादाचे पूल उभारल्यास दोघांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील' असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्यावतीने रविवारी आयोजित अकराव्या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हॉटेल सयाजी येथे परिषद झाली. परिषदेत जीपीए आयकॉन सन्मानाने डॉ. राजेश कुंभोजकर यांना गौरवण्यात आले. परिषदेत जिल्हाभरातून चारशेहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.


मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, 'डॉक्टर समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. समाज बांधणीचे काम डॉक्टरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकते. सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवल्या जात आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील होमिओपॅथिक, आयुर्वेदिक डॉक्टर प्राथमिक सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे जाळे वाढत आहे. असोसिएशनच्या माध्यमातून अशा लोकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत.'


डॉ. वसंतराव देशमुख म्हणाले, 'वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन आधुनिक बदल होत आहेत. नव्या बदलांची माहिती स्थानिक डॉक्टरांना व्हावी यासाठी अशा परिषदांची सातत्याने गरज आहे. कालानुरूप उपचार पद्धतीत बदल होत आहेत. नव्या गोष्टी आत्मसात केल्यास रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देता येतील.'


परिषदेत ॲलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेदिक शाखांतील व्याख्याने झाली. होमिओपॅथिक तज्ञ मोहन गुणे यांनी विविध आजारावर होमिओपॅथीचा होणार फायदा सांगितला. ॲलोपॅथी विषयात डॉ. प्राची जाधव, थायरॉईडबाबत माहिती दिली. डॉ. सतीश उदेग यांनी आयुर्वेदिक रसायनशास्त्र चिकित्सा पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. सिटीस्कॅन, एमआरआय तंत्रज्ञानाचा फायदा या विषयावर डॉ. मंजित कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. उच्च रक्तदाब, हृदयविकार यावरती आयुर्वेदिक उपचार पद्धती याबाबत माधवबागचे डॉ. रोहित साने व्याख्यान झाले. अध्यक्षा डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. विनायक शिंदे, उषा निंबाळकर, प्राची जाधव, वीरेंद्र कानडीकर, वर्षा पाटील, शिवराज जितकर, मंजिरी कानिटकर उपस्थित होते. डॉ. महादेव जोगदंडे यांनी प्रास्ताविक केले.